पुण्यातील कुंडेश्वर येथे अपघात (फोटो- सोशल मीडिया/ani)
१. पुणे जिल्ह्यात भीषण अपघात
२. पिकअप रिव्हर्स येऊन दरीत कोसळली
३. ८ महिलांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे/प्रभाकर जाधव: पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील खेड येथे देवदर्शनाला गेलेल्या ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुंडेश्वर येथे दर्शनाला गेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे जिल्झ्यातील ८ भाविकांवर काळाने घाला घातला आहे. खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दुर्दैवी घटना घडली आहे. कुंडेश्वरचा डोंगर चढताना भाविकांनी भरलेले एक वाहन (पिकअप) पलटी होऊन दरीत कोसळली. रिव्हर्स झालेली पिकअप ५ ते ६ वेळेस दरीत पलटी झाली. या दुर्घटनेत ८ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे.
आज श्रावणातील तीसरा सोमवार निमित्ताने श्रद्धेने देवदर्शनासाठी निघालेला प्रवास क्षणात हृदय पिळवटून टाकणाऱ्या शोकांतिका ठरला. पाईट (ता. खेड) येथील ४० हून अधिक महिला भाविक दर्शनासाठी कुंडेश्वरकडे निघाल्या होत्या. मात्र सोमवारी सकाळी, नागमोडी वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि जीप तब्बल १०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात ८ महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ३२ जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त जीपमध्ये एकूण जवळपास ४० महिला भाविक प्रवास करत होत्या. जखमींना तातडीने चांडोली ग्रामीण रुग्णालय तसेच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. कुंडेश्वर घाट परिसर हा तीव्र चढ-उतार आणि नागमोडी वळणांसाठी ओळखला जातो. मात्र, थोडीशी चूकही येथे जीवघेणी ठरते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. स्थानिकांनी वाहतुकीदरम्यान सावधगिरीचे आवाहन केले आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांना श्रद्धांजली आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली जात आहे. अपघाताची वार्ता गावात पोहोचताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयांकडे धाव घेतली. काहींचा जीव वाचला याचा दिलासा, तर काहींचा निरोप कायमचा झाल्याने डोळे पाणावले.