Purandar Politics: पुरंदरमध्ये महायुतीत पुन्हा संघर्षाची ठिणगी; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने
MNS Raj Thackeray News: पुणे ‘मनसे”त मोठे फेरबदल? ‘भाकरी फिरवून’ राज ठाकरे कोणाला देणार संधी?
महायुती झाल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत आमदार विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरुवातीला जोरदार संघर्ष झाला. बारामती लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार नसल्याची ठाम भूमिका शिवतारे यांनी घेतली होती. अजित पवार यांच्यावर टीका करताना अजित पवार हा विंचू असून अनेकांना डसला आणि महादेवाच्या पिंडीवर जावून बसला. त्यामुळे आता त्याला मारायचे म्हणले तरी पिंडीला लागते असे म्हणून जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवतारे आणि अजित पवार यांच्यात दिलजमाई झाली. त्यामुळे शिवतारे यांना नांगी ठेचण्याऐवजी पवारांसमोर नांगी टाकावी लागली. शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. मात्र, प्रत्यक्षात त्यांना पुरंदरमध्ये मताधिक्य मिळू शकले नाही.
२०१९ च्या निवडणुकीत संजय जगताप यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. त्यावेळी शिवतारे यांच्या पराभवासाठी अजित पवार यांनी ताकद लावली. ‘तू कसा निवडून येतो तेच मी बघतो,’ असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी शिवतारे यांना दिले. त्या निवडणुकीत शिवतारे यांचा पराभव झाला. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवतारे सुरुवातीला विरोधाच्या भूमिकेत होते. तसेच पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्या पराभवाची मनात सल असल्याने विधानसभा निवडणुकीत महायुती असतानाही अजित पवार यांनी विजय शिवतारे यांच्या विरोधात संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी दिली. शिवतारे यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी आमदार संजय जगताप उमेदवार होते. तसेच अजित पवार यांनी उमेदवार उभा करूनही शिवतारे विजयी झाले.
इचलकरंजी महानगरपालिकेत पद 1 अन् इच्छुक 27; नेत्यांची कृपादृष्टीतील पहिला मानकरी कोण?
आमदार विजय शिवतारे यांच्या आग्रहास्तव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी फुरसुंगी आणि उरुळी कांचनचा परिसर महापालिका हद्दीतून वगळून स्वतंत्र नगर परिषद तयार केली. त्यामुळे नगरपरिषद ताब्यात येईल, असा शिवतारे यांचा व्होरा होता. निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आणि शिवतारे हे पुन्हा समोरासमोर आले. मात्र ही नगर परिषद अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात घेण्यात यश मिळवले.
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवतारे यांच्यात लढत असल्याने दोघांमधील संघर्ष चांगलाच पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार आणि शिवतारे यांच्यात पुन्हा एकदा लढत होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने युती करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. मात्र, पुणे महापालिकेप्रमाणे भाजपने ऐन वेळी युती न करता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये असल्याने शिवतारे आणि जगताप या राजकीय हाडवैर असलेल्या दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा लढत होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने आले आहेत.
पुरंदरमध्ये अजित पवार, विजय शिवतारे आणि संजय जगताप या महायुतीतील मित्रपक्षांच्या तीन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. विजय शिवतारे हे नगर परिषदेतील पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत. तर संजय जगताप हे विजय शिवतारे यांनी विधानसभेत केलेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सरसावले आहेत. तर अजित पवार दोघांमधील राजकीय संघर्षाचा फायदा घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे पुरंदरमध्ये महायुतीतील मित्रपक्षांमध्येच संघर्ष पेटल्याचे दिसून येते.






