सचिन तेंडुलकर(फोटो-सोशल मीडिया)
Happy Birthday Sachin Tendulkar : आज क्रिकेटच्या देव म्हणजेच सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकर आज आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. सचिन तेंडुलकरने २४ वर्षे क्रिकेटचे मैदान गाजवले आहे. त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना आपल्यासमोर २२ यार्डच्या खेळपट्टीवर गुडघे टेकण्यास मजबूर केले. त्याने अनेक विक्रम रचत, विक्रमांचाच एक विक्रम रचला आहे. सचिन तेंडुलकरने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच १८ डिसेंबर १९८९ रोजी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणापासून ते कारकिर्दीच्या शेवटापर्यंत त्याने अनेक विक्रम मोडले आणि असे अनेक विक्रम देखील केले. जाणून घेऊया क्रिकेटच्या देवांबद्दल अधिक माहिती..
सचिन तेंडुलकर एका महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्माला आला आहे. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे एक प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. सचिनचा भाऊ अजित तेंडुलकर यांनी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मोठी भूमिका वठवली आहे. त्याच्या भावाने सचिनची खेळातील क्षमता ओळखून त्याला प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे घेऊन गेला. त्यानंतर सचिनने रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घ्यायाल सुरवात केली.
सचिन तेंडुलकरची क्रिकेट कारकिर्द पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुरू झाली. त्यावेळी त्याचे वय केवळ १६ वर्ष होते. मैदानावर पाऊल ठेवताच तो सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेट खेळणारा पहिला खेळाडू ठरला होता. त्याचे पदार्पण त्यावेळी चर्चेचा विषय बनला होता, परंतु पदर्पणात तो फारसे काही करू शकला नाही. मात्र, त्यान एक गोष्ट मात्र सर्वांच्या लक्षात आणून दिली ती म्हणजे तो मोठ्या गोलंदाजांचा सहज सामना करण्याची ताकद ठेवतो.
सचिन तेंडुलकरने १९९० मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले होते. या शतकाच्या मदतीने भारताने इंग्लंडविरुद्ध सामना अनिर्णित राखला होता.
सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल ४९ शतके झळकावली आहेत. एकेकाळी असे वाटत होते की हा विक्रम क्वचितच कुणाला मोडता येईल, परंतु विराट कोहलीने हा विक्रम मोडीत काढत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ शतके केली आहेत. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक १९९४ मध्ये कोलंबो येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले होते.
पहिल्या शतकापासून सचिन तेंडुलकरने मागे वळून पाहिले नाही. त्याने मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा आणि सर्वाधिक सामने खेळण्याचा देखील विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर नोंदवाला गेला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० धावा करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू ठरला होता. २०११ च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच्या अनेक खेळींनी भारताला विजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सचिनने ४६३ सामन्यांच्या ४५२ डावांमध्ये ४४.८३ च्या सरासरीने १८२४६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ४९ शतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २०० राहिली आहे.
हेही वाचा : SRH Vs MI: ‘हीटमॅन’च्या दमदार खेळीने मुंबई पलटणचा ‘एसआरएच’वर दणदणीत विजय; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेट गाजवळिया आहे. त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत. त्याने २०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. या दरम्यान त्याने ५१ शतके देखील झळकावली आहेत. जो स्वतःच एक जागतिक विक्रम ठरला आहे. सचिन तेंडुलकरने कसोटीत १५,९२१ धावा केल्या आहेत. त्याने १९९९ मध्ये चेन्नई येथे पाकिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले होते.
सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या दिवशी एका युगाचा अंत झाला होता. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा समना खेळून क्रिकेटला निरोप दिला होता. सचिनने वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सामन्यात त्याने ७४ धावांच्या खेळीने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला होता. सचिनची निवृत्ती हा संपूर्ण देशासाठी भावनिक क्षण होता.
सचिन तेंडुलकरला भारताचा सर्वोत्तम नागरी पुरस्कार देण्यात आला आहे. २०१४ मध्ये सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यात आला होता. हा सन्मान मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला होता. यापूर्वी त्यांना १९९४ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९९७ मध्ये त्यांना राजीव गांधी खेलरत्न, १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.