Israel-Turkey Conflict: इस्रायल पहिल्या महायुद्धाच्या आगीत तेल का ओतत आहे? तुर्कस्तानसोबतचा संघर्ष वाढेल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Israel recognizes Armenian Genocide 2026 : जागतिक राजकारणात आणि मध्य-पूर्व आशियात (Middle East) सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या आगीत आता आणखी एक मोठी ठिणगी पडली आहे. इस्रायलच्या (Israel) मंत्रिमंडळाने एका अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक ठरावाला एकमताने मंजुरी दिली आहे, ज्याचे थेट पडसाद तुर्की आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहेत. पहिल्या महायुद्धादरम्यान (World War I) ओटोमन साम्राज्याकडून झालेल्या आर्मेनियन लोकांच्या हत्येला आता इस्रायलने अधिकृतपणे ‘वंशसंहार’ (Armenian Genocide) म्हणून मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता हा ठराव मंजुरीसाठी इस्रायलच्या संसदेत (Knesset) सादर केला जाणार आहे. मात्र, इस्रायलच्या या पवित्र्यामुळे तुर्कस्तानसोबतचे त्याचे आधीच ताणलेले संबंध आता पूर्णपणे तुटण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत.
हा वाद शतकाहून अधिक जुना आहे. पहिल्या महायुद्धादरम्यान, म्हणजेच १९१५ च्या सुमारास अंदाजे १५ लाख आर्मेनियन लोकांचा मृत्यू झाला होता. आर्मेनिया आणि जगातील बहुतांश इतिहासकारांचा असा दावा आहे की, हा २० व्या शतकातील पहिला आणि सर्वात मोठा पद्धतशीर वंशसंहार होता. मात्र, तुर्कस्तानने हा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे. तुर्कीच्या मते, हे लोक कोणत्याही नियोजित वंशसंहारात मारले गेले नसून, पहिल्या महायुद्धाच्या वेळच्या गृहयुद्धात आणि परिस्थितीमुळे मरण पावले होते. त्यामुळे जगभरातील कोणत्याही देशाने या घटनेला ‘वंशसंहार’ म्हणून मान्यता देऊ नये, अशी तुर्कीची अधिकृत आणि आक्रमक भूमिका राहिलेली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NASA Swift Boost Mission: नासा पहिल्यांदाच वाचवणार पडणारा उपग्रह; यशस्वी होईल का 282 कोटी रुपयांची बचाव मोहीम?
गेल्या अनेक दशकांपासून इस्रायलने तुर्कस्तानला नाराज करणे टाळण्यासाठी या संवेदनशील मुद्द्यावर जाणीवपूर्वक मौन बाळगले होते. मध्य-पूर्व आशियात तुर्की हा एक शक्तिशाली मुस्लिम देश असल्याने, इस्रायलला त्यांच्याशी असलेले राजनैतिक संबंध बिघडवायचे नव्हते. परंतु, अलिकडच्या वर्षांत गाझा पट्टी, लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि इराणसोबत सुरू असलेल्या थेट युद्धामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. तुर्कीचे अध्यक्ष तय्यप एर्दोगन यांनी गाझा युद्धावरून इस्रायलवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे बिघडले असून, आता इस्रायलने आपली रणनीती बदलत तुर्कीच्या सर्वात कमकुवत नसेवर बोट ठेवले आहे.
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांनी या निर्णयाचे समर्थन करताना स्पष्ट केले की, “इतिहास बदलण्याचे आणि आर्मेनियन नरसंहार नाकारण्याचे प्रयत्न बऱ्याच काळापासून झाले आहेत. परंतु, योग्य निर्णय घेण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. हे आमचे नैतिक आणि ऐतिहासिक कर्तव्य आहे.” त्यांनी पुढे आठवण करून दिली की, आतापर्यंत अमेरिका, सीरिया आणि लेबनॉनसह जगातील ३२ देशांनी या ऐतिहासिक घटनेला नरसंहार म्हणून आधीच मान्यता दिली आहे आणि आता इस्रायलही अधिकृतपणे या देशांच्या यादीत सामील होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मुहर्रमच्या विशेष कार्यक्रमात ‘त्या’ दृश्यामुळे खळबळबळ! Pakistan सरकारने Geo Newsवर घातली 15 दिवसांची बंदी, वाचा नक्की काय घडलं?
हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा इस्रायल स्वतः आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत गंभीर आरोपांचा सामना करत आहे. संयुक्त राष्ट्र (UN), मानवाधिकार संघटना आणि तुर्कस्तानसह जगातील अनेक देशांनी इस्रायलवर गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांचा वंशसंहार केल्याचा आरोप केला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ७ ऑक्टोबर २०२३ नंतर सुरू झालेल्या या भीषण युद्धात आतापर्यंत ७३,००० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत, ज्यामध्ये जवळपास निम्म्याहून अधिक निष्पाप महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या स्वतंत्र तज्ञांनी इस्रायलवर गाझामधील लहान मुलांना जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचे आणि अन्न-पाण्याची नाकेबंदी करून मानवी संकट निर्माण केल्याचे वारंवार आरोप केले आहेत. मात्र, इस्रायलने हे सर्व आरोप नेहमीप्रमाणे फेटाळून लावले आहेत. इस्रायलचा असा दावा आहे की, ते सामान्य नागरिकांवर हल्ले करत नाहीत, तर दहशतवादी संघटना हमास तिथल्या नागरिकांना आणि लहान मुलांना मानवी ढाल (Human Shield) म्हणून वापरत आहे. यामुळेच आर्मेनियन वंशसंहाराला मान्यता देण्याचा इस्रायलचा हा प्रयत्न स्वतःवरील आंतरराष्ट्रीय दबाव आणि टीका वळवण्यासाठी खेळलेली एक राजकीय खेळी असल्याचेही काही तज्ञांचे म्हणणे आहे.






