‘मराठीतलं हे एक सर्वार्थाने मोठे नाटक आहे. नाटकाचा विषय तर अगदी चाकोरी बाहेरचाच. वास्तवाच्या गाभ्याला हात घालणारा आणि धक्कादायक आहे. या नाटकाचे पहिले दोन अंक युजीन ओनीलच्या लिखाणाची आठवण करून देणारे…’
अभ्यासू रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांनी हे नाटक वाचून आणि प्रयोग बघून ही पहिली प्रतिक्रिया नोंदविली. जी खूप काही सांगून जाणारी. नाटक आहे चारचौघी आणि लेखक – प्रशांत दळवी, दिग्दर्शक – चंद्रकांत कुलकर्णी. १९९१ साली १५ ऑगस्ट या दिवशी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात याचा शुभारंभ झाला.
लता नार्वेकर यांच्या श्री चिंतामणीची ही निर्मिती होती. या नाटकाने मराठी नाटकातील विषयाला एका वळणावर नेले. ज्याची दखल केवळ मराठी रसिकांपूरती नाही तर इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली या भाषांमध्येही त्याचे रूपांतर – भाषांतर झाले. मराठी नाटकाच्या प्रवाहात ‘चारचौघी’ म्हणजे स्त्रियांच्या तत्कालिन अस्तित्वाचा वेध आणि शोध घेणारे ठरले. ज्याचा विषय हा आज ३१ वर्षे उलटली तरी कायम आहे. जो आजही विचार करायला लावतो.
चॉकलेट हिरो अशी ओळख असलेला अभिनेता सुनील बर्वे याने रंगभूमीवर एक ‘हर्बेरियम’ हा उपक्रम राबविला. त्यात गाजलेल्या पाच नाटकांचे नव्या संचात २५ प्रयोग करण्यात आले. नाटकांच्या दर्जेदार निर्मितीला त्यातून उजाळा मिळाला.
वसंत कानेटकरांचे सूर्याची पिल्ले, बाळ कोल्हटकर यांचे ‘लहानपण देगा देवा’, अनिल बर्वे यांची ‘हमीदाबाईची कोठी’, शाहीर साबळे यांचे ‘आंधळं दळतंय्’, बबन प्रभूंचे ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकांचा समावेश होता. ‘हर्बेरियम’मुळे मराठी रंगभूमीचा इतिहास जागा झालाच शिवाय हाऊसफुल्ल गर्दीमुळे सोनेरी दिवस अवतरले… जूनं ते सोनं. त्याचाही रसिक वर्ग आहे. याचा अनुभव साऱ्यांनी घेतला.
‘चारचौघी’ नाटक याच वाटेवरून रंगभूमीवर पुन्हा एकदा पोहचत आहे. लेखन + दिग्दर्शन कायम आहे, पण नव्या टिमसह नाटक मर्यादित प्रयोगांसाठी नव्हे तर पूर्ण तयारीत निघाले आहे. मूळ प्रयोगात प्रतिक्षा लोणकर, वंदना गुप्ते, दीपा श्रीराम, आसावरी जोशी, मिलिंद सफई, प्रबोध कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांच्या भूमिका होत्या. आज २०२२ या वर्षात ३१ वर्षांनंतर रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे यांच्या भूमिका आहेत.
विनोदी नाटकांची चलती असतांना एका आशयप्रधान विचार प्रवर्तक गंभीर नाटकांचा नवा डाव या निमित्ताने रचण्यात आलाय. यातल्या चारचौघी काही प्रश्न घेऊन उभ्या राहतात. त्यांचा समाजात जगण्यासाठीचा संघर्ष आहे.
नाटककार प्रशांत दळवी यांच्या या नाटकाचं कुळ अन् मूळ हे एका पथनाट्यातलं आहे. १९८३ सुमारास ‘स्त्री’ हे पथनाट्यमय एकांकिकेचा प्रयोग झाला. स्त्रियांच्या एकूणच समस्यांवर त्यात प्रकाशझोत होता. औरंगाबादच्या महाविद्यालयातला याचा प्रयोग तुफान गाजला. तिथून सुरू झालेला प्रवास हा तीनअंकी नाटकापर्यंत पोहचला. स्त्रीचे दोनशेपार प्रयोग झालेले. त्यातून एकेक व्यक्तिरेखा त्यांचा संघर्ष हा नाटककार म्हणून प्रशांतला शांत बसू देत नव्हता. कथानकातील स्त्रीया या नशिबाला दोष न देता झगडण्याची ताकद सिद्ध करतात. त्या जागृत आहेत आणि आपण घेतलेल्या निर्णयाशी ही ठाम आहेत.
यातील आई ही चौकटीतली नाही. तर नव्या विचारांशी आणि परिस्थितीशी सामना करणारी आहे लग्न न करता एकाच पुरुषावर प्रेम करून तिने तीन मुलींना जन्म दिलाय. तिच्या जीवनातला पुरुष संसारी आहे. त्याच्या संसारात न शिरता एकपालकत्व हे आईने स्वीकारलंय. तिची विद्या ही मोठी मुलगी. विनी धाकटी मुलगी. वैजू ही तिसरी मुलगी. आई विद्या, वैजू आणि विनी या चार स्त्रीयांभोवती त्यांच्या भावनिक गुंतेभोवती नाट्य उभे केलंय. आईप्रमाणे तिघी मुली या स्वतंत्र विचारांच्या. जीवनाची दिशा ही त्यांनीच ठरवली आहे. प्रसंगी दशा झाली तरी आपलाच निर्णय म्हणून त्या स्वीकारण्यासही तयार आहेत.
‘चारचौघी’ नाटकाचे कथानक मांडताना त्याला असणारे अनेक कंगोरे हे नवी दृष्टी आणि विचार हे उभ्या समाजाला देणारे आहेत. यातील बायका या जराही कुठेही देव, नियती, अंधश्रद्धा याचा विचारही करीत नाहीत. त्यांच्या जीवनात याचा साधा उल्लेखही नाही. पूर्णपणे नव्या विचारांचे पडसाद यांच्या संवादात दिसतात. अर्थात काही कर्मठ मंडळींना ते वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह तीस वर्षांपूर्वी वाटले. जे आजही काहींना वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे कारण स्त्रीयांकडे बघण्याची काहींची मनोवृत्ती. जी आजही बदललेली नाही. पुरुषप्रधान संस्कृतीने जखडलेल्या व्यवस्थेचा विचार करून कुठल्याही परिस्थितीत ठामपणे उभे राहाण्याचा संदेश आणि प्रेरणा ही संहिता देत आहे.
एका मुलाखतीत नाटककार प्रशांत दळवी म्हणतात – ‘चारचौघी’ नाटक पाहून अनेकांनी म्हटले की ‘या नाटकातील स्त्रीयांनी आयुष्यात वेगळे निर्णय घेतले पण त्यांना त्यातून काय मिळाले? ती सुखी झालीत काय? तिला सुद्धा कितीतरी नव्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले!’ यावर मी म्हणतो – आयुष्यात वेगळे निर्णय त्यांनी घेतले कबूल. पण तरी त्या स्त्रीया निर्णयाशी प्रामाणिक राहिल्या. त्यांनी कुठेही हार मानलेली नाही. त्या पराभूत नाहीतच! प्रत्येक जण आयुष्याशी संघर्ष हा करीत असतो. तो चिरंतन राहणारच. चारचौघींच्या मूळाशी जाऊन त्यांचा झगडा मला मांडायचा होता. आणि तो नाटकातून मांडलाय!’
रजनी अपसिंगेकर या साहित्य अभ्यासक असणाऱ्या तज्ज्ञ महिलेने या नाटकावर संशोधनात्मक लेखन केलंय. या नाट्याचा स्त्रीमुक्ती चळवळीच्या पार्श्वभूमीवर वेध घेतलाय. शिवाय चारचौघीतल्या व्यक्तिरेखा, सामाजिक समस्या, संघर्ष, नाट्य वस्तू आणि एक संहिता म्हणून साहित्यप्रकार याचा वेध घेतलाय. त्याचे एक पुस्तकही २००३ साली लोकवाड्:मय गृहाने प्रसिद्ध केलं. त्या एके ठिकाणी म्हणतात. यातील चारही स्त्रीया या एकविसाव्या शतकातील आहेत. स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून पाहिले जावे. केवळ ‘स्त्री’ म्हणून तिच्यावर बंधने लादू नयेत. यातील चारहीजणी पन्नास वर्षे पुढे जाऊन विचार करतात… विचार बंडखोर असले तरी कृतीने त्या प्रत्यक्षात ‘चारचौघीं’सारख्याच आहेत!
एका पिढीने बघितलेलं नाटक आज नव्या दुसऱ्या पिढीपुढे आलंय. विषय जुना – बूरसटलेला हा तेंव्हाही नव्हता आणि आजही नाही. तो कालबाह्य झालेला नाही. एक नाट्यप्रयोग म्हणून त्यात परिपूर्णता आहे. हजारो प्रयोगांचा अनुभव गाठीशी असलेले, लाखो रसिकांनी प्रेम केलेले आणि देशभरातील नाट्य अभ्यासकांचे त्यावर विचारमंथन असलेल्या या चारचौघी.
-संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com






