नवी दिल्ली : पुण्यातील राठी हत्या प्रकरणाची (Rathi Murder Case) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कारण गुन्हा ज्यावेळी घडला होता त्यावेळी आरोपी हा अल्पवयीन होता हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. नारायण चेतनराम चौधरी (Narayan Chetanram Chaudhary) असे या आरोपीचं नाव आहे. त्याने तब्बल 28 वर्षे तुरुंगात घालवली आहेत. आता नारायण चौधरी याला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
1994 मध्ये राठी हत्या प्रकरणाने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला होता. यामध्ये आरोपी नारायण चौधरी याने गर्भवती महिलेसह सात जणांची हत्या केल्याचा आरोप होता. मिठाईच्या दुकानात नारायण चौधरी कामाला होता. पगारवाढीच्या मुद्यावरून आरोपींनी मालक केसरीमल राठी यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी हा डाव फसला होता. त्यामुळे आरोपींनी त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. त्यात नारायण चौधरी हा आरोपी होता. मात्र, आता ज्यावेळी हा गुन्हा घडला त्यावेळी नारायण चौधरी हा अल्पवयीन होता, असे न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे म्हटले आहे. त्यानंतर त्याला सोडण्याचे आदेश जारी केले.
नारायणकडून पुनर्विचार याचिका
आरोपी नारायण चेतनराम चौधरी याचं वय 20 असल्याचा खटला सुरु असताना नोंद करण्यात आली होती. मात्र, नंतर त्याने गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन होतो, असे सांगत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. तसेच आरोपी चौधरी आणि त्याच्या दोन साथीदारांपैकी एकाने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. त्यानंतर राष्ट्रपतींनी जितेंद्र गेहलोत या आरोपीची फाशीची शिक्षा ही जन्मठेपेत बदलली.
येरवडा कारागृहात बंदिस्त
सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिले. नारायण चौधरी हा व्यक्ती गेल्या 28 वर्षांपासून पुण्याच्या येरवडा कारागृहात बंद आहे. गुन्ह्याच्या वेळी तो व्यक्ती अल्पवयीन होता.






